आत्मश्रद्धा

आत्मश्रद्धा 

    

आत्मश्रद्धा

Photo by Hernan Pauccara from Pexels

    मानवाच्या सफलतेचे मूळ त्याच्या आत्मश्रद्धेत सामाविलेले आहे . आत्मश्रद्धेचा सरळ संबंध संकल्पबळाशी आहे . तनबळ , मनबळ , बुद्धीबळ आणि आत्मबळ - असे अनेक प्रकारचे बळ आहे , त्यांच्यापैकी आत्मबळ सर्वश्रेष्ठ आहे . आत्मबळात अचल श्रद्धाही विजयप्राप्तीची सर्वोत्तम गुरुकिल्ली आहे . जेथे आत्मबळ नाही तेथे असफलता , निराशा , निर्धनता , रोग इ . सर्व प्रकारचे दुःख पाहावयास मिळतात . याउलट आत्मबळात अचल श्रद्धा आहे तेथे सफलता , समृद्धी , सुख , शांती , सिद्धी इ . अनेक प्रकारचे सामर्थ्य पाहावयास मिळते . 

    जसजसा मनुष्य स्वतःच्या सामर्थ्यात अधिकाधिक विश्वास ठेवतो , तसतसा तो व्यवहार व परमार्थात अधिकाधिक विजय प्राप्त करतो . अमुक कार्य करण्याचे त्यात सामर्थ्य आहे , असा विश्वास आणि श्रद्धा हे कार्यसिद्धीचे मूलभूत रहस्य आहे . मनुष्य स्वतःची उन्नती लवकर करू शकत नाही याचे मुख्य कारण हे आहे की त्याला स्वतःच्या सामर्थ्याची शंका असते . 

    तो ' अमुक कार्य माझ्याकडून होऊ शकणार नाही . ' असा विचार करतो , ज्याचा परिणाम हा होतो की तो ते कार्य कधी करण्याचा प्रयत्नही करीत नाही . आत्मश्रद्धेचा सरळ संबंध संकल्पबळाशी आहे . आत्मबळात अविश्वास प्रयत्नांच्या सर्व शक्तीला क्षीण करतो . प्रयत्नाविना कोणतेही फळ मिळत नाही . म्हणून प्रयत्नांना उत्पन्न करणाऱ्या आत्मश्रद्धेचा ज्याच्यात अभाव आहे त्याचे जीवन निष्क्रिय ,  निरुत्साही व निराशाजनक होते . जेथ - जेथे एखादा लहान - मोठा प्रयत्न होतो तेथे - तेथे त्याच्या मुळाशी आत्मश्रद्धाच असते आणि अंतःकरणात जोपर्यंत आत्मश्रद्धा आहे , तोपर्यंत प्रयत्नरूपी प्रवाह अखंडरूपी प्रवाहित होत असतो . 

    आत्मश्रद्धा असाधारण असते तेव्हा प्रयत्नांचा प्रवाह एखाद्या विघ्नाने न थांबेल असा असाधारण व अद्वितीय असतो . ' मी अमुक कार्य करू शकेल . ' - अशी साधारण श्रद्धा जरी अंतःकरणात असली तरीही प्रयत्न सुरू होतो व प्रयत्नांमध्ये मनुष्यात असलेल्या गुप्त सामर्थ्याला प्रगट करणारे अमोघ बळ सामाविष्ट असते . आगकाडीत अग्नी आहे ; परंतु जोपर्यंत तिचे घर्षण होत नाही तोपर्यंत करोडो वर्षे अशीच पडून राहिली तरीही तिच्यातून अग्नी प्रगट होत नाही . तिला घर्षण करूनच अग्नी प्रगट केला जाऊ शकतो . 

    तसेच मनुष्यात असलेले अत्यंत गूढ सामर्थ्य प्रयत्नांद्वारेच प्रगट होते . मनुष्यात किती सामर्थ्य सामाविलेले आहे याचा निर्णय कोणीही करू शकत नाही . शास्त्रे तर त्याला शाश्वत , सर्व सामर्थ्यवान् , सर्वज्ञ , सत् - चित् - आनंद , अनंत , अखंड , अव्यय , अविनाशी , निरंजन , निराकार , निर्लेप आणि परम प्रेमास्पद म्हणतात , म्हणून मनुष्याला जसे व्हायचे तसा होऊ शकतो . पाणिनींसारखे वैयाकरणिक , पतंजलींसारखे योग - प्रवर्तक , वशिष्ठ मुनींसारखे तत्त्वज्ञ , विश्वामित्रांसारखे महान तपस्वी , जैमिनींसारखे उत्तम मीमांसक , कालिदासांसारखे समर्थ कविकुशलशिरोमणी , धन्वंतरींसारखे वैद्य , भास्कराचार्यासारखे प्रखर ज्योतिर्विद , लिंकनसारखे मानवतावादी , म . गाधीजींसारखे सत्यनिष्ठ , रमण महर्षीसारखे तत्त्वनिष्ठ , टागोरांसारखे महान कवी , जिब्रानसारखे सर्वांग सर्जक , स्वामी रामतीर्थासारखे वैरागी , विवेकानंदांसारखे धर्म धुरंधर , हेनरी फोर्डप्रमाणे उद्योगपती , आईन्सटाईनसारखे वैज्ञानिक , सुकरातसारखे सत्यवक्ता , डायोजिनियससारखा निःस्पृही , सीझरसारखा विजेता , तुकाराम महाराजांसारखे क्षमाशील आणि ज्ञानदेवांप्रमाणे ज्ञानी - असे आत्मश्रद्धेला अंतःकरणात स्थिर करूनच होता येते . ज्याच्या अंतःकरणात आत्मश्रद्धा असते , मग तो एकदम एकटा असला , साधनहीन असला तरीही यश त्यालाच माळ घालते . त्याच्या रोमा - रोमात व्याप्त आत्मश्रद्धारूपी लोहचुंबक जवळील असंख्य साधनारूपी लोहकणांना खेचून घेते . 

    याउलट ज्याची आत्मश्रद्धा दबली आहे तो जरी लाखो मनुष्यांनी घेरलेला असला आणि असंख्य साधनांनी संपन्न असला तरीही पराजित होतो . अशी अनेक उदाहरणे आपल्याला उघड्या डोळ्यांद्वारे पाहायला मिळतात . आपले इष्टावतार श्री रामचंद्रांच्या जीवनाचाच दृष्टांत घ्या . ज्याने देवांनासुद्धादास बनविले होते अशा रावणाला पराजित करण्याचा निश्चय जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांच्याजवळ कोणती साधने होती ? समुद्र पार करण्यासाठी त्यांच्याजवळ एक छोटीशी नावदेखील नव्हती . 

    रावण आणि त्याची विशाल सेनेशी टक्कर घेऊ शकेल असा एकही योद्धा त्यावेळी त्यांच्याजवळ नव्हता ; तरीही श्रीरामांनी निश्चय केला सीतेला प्राप्त करण्याचा , रावणाला पराजित करण्याचा , तेव्हा प्रचंड शक्तीशाली रावणदेखील रणभूमीत धूळ चाटू लागला . हे काय सिद्ध करते ? 

क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे । 

    कार्यसिद्धीमध्ये प्रथम साधनांची नव्हे तर आत्मश्रद्धेची आवश्यकता आहे . आत्मश्रद्धेमागे साधने तर त्याच प्रकारे येतात जशी शरीराच्या मागे सावली . ध्रुवाचे उदाहरण पहा . कोठे पाच वर्षाचा छोटासा एक बालक आणि कोठे सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णूंच्या अढळ पदाची प्राप्ती ! नारदांनी अनेक विघ्ने सांगितली तरीही ध्रुव थोडाही डगमगला नाही . ' दुसऱ्यांना जरी हे असाध्य वाटेल ; परंतु माझ्यासाठी काहीही असाध्य नाही . ' अशा दृढ आत्मविश्वासाने त्याने भयंकर तप सुरू केले , त्याच्या फळस्वरूप भगवान विष्णूंना दर्शन द्यावे लागले . शिवाजी , लिंकन , गांधीजी , रामकृष्ण परमहंस , विवेकानंद , सॉक्रेटिस , नरसी मेहता , मीराबाई , स्वामी रामतीर्थ , रमण महर्षी , परमहंस योगानंद , परम पूज्य लीलाशाहजी महाराज , स्वामी टेऊँराम त्यांच्या आत्मश्रद्धेतच सामावलेले दिसून येईल . 

    पार कोणत्याही महापुरुषांचे जीवन पाहिले तर त्यांच्या सफलतेचे रहस्य आत्म्यात अचल श्रद्धा असली पाहिजे . स्वतःमध्ये थोडासाही संशय , शंका अथवा अविश्वास आला तर निराशा व असफलता मिळाल्याशिवाय राहत नाही . लाखो योद्ध्यांना युद्धात पराजित करणाऱ्या अर्जुनाचा सामान्य भिल्लांकडून पराजयात आणि ' अशक्य ' शब्दही ज्याच्या शब्दकोशात नव्हता अशा नेपोलियनच्या ' वॉटरलू'च्या युद्धात पराजयाचे कारण आत्म्यात निर्माण झालेल्या क्षणभरच्या अविश्वासाशिवाय अन्य काहीही नव्हते . आत्म्यात अविश्वास तृणासारख्या संकटालाही पर्वताप्रमाणे करतो आणि आत्म्यात विश्वास पर्वतासारख्या संकटांनाही तृणसारखे करतो . 

    आत्मबळावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांनीच या विश्वात सामान्य मनुष्याला अशक्य दिसणारी कार्ये यशस्वी करून दाखविली . ' अमुक कार्य मी जरूर करू शकेन . ' असे दृढतापूर्वक मानणे आणि त्यानुसार प्रयत्न करणे याचे नाव आहे श्रद्धा . एखादी गोष्ट मानणे , परंतु त्यानुसार प्रयत्न न करणे ही श्रद्धा नाही , तर भेकडपणा अथवा प्रमाद आहे . आत्मबळावर श्रद्धा उत्पन्न होताच भेकड शूरवीर होतात , प्रमादी आणि आळशी पुरुषार्थी होतात , मूर्ख विद्वान होतात , रोगी निरोगी होतात , दरिद्री धनवान होतात , निर्बळ बलवान होतात , आणि जीव शिवस्वरूप होतात . असफलतेने हताश होऊ नका . पाऊस येण्यापूर्वी कडक ऊन पडते . त्या उष्णतेने व्याकूळ होऊ नका . जेव्हा उंच उडी मारायची असते तेव्हा पाच - दहा पाऊले मागे जावे लागते . म्हणून असफलतेने निराश होऊ नका . हिंमत ठेवा . अधिक मेहनत करा . अधिक तीव्र पुरुषार्थ करा . 

    भेकड नका . कर्तव्यापासून च्युत होऊ नका . अंतःकरणात आत्मश्रद्धा ठेवून अधिकाधिक पुरुषार्थ करा . सफलता तुम्हाला मिळेलच . ज्यात वक्ता होण्याचीथोडीदेखील योग्यता नव्हती असे महान ग्रीक वक्ता डिमोस्थिनिसांनाच पहा . ज्यांचे उच्चारणही स्पष्ट नव्हते , सभेत उभे राहताच ज्यांचे पाय थरथर कापत होते आणि ज्यांच्यात पूर्ण विद्वत्तादेखील नव्हती असे डिमोस्थिनिसांनी निश्चय केला की मला सर्वोत्कृष्ट वक्ता व्हायचे आहे . माझ्यात असे होण्याचे पूर्ण सामर्थ्य आहे . ' आणि समुद्रकिनारी जाऊन , समुद्राच्या लाटांना जिवंत श्रोता मानून बोलण्यास सुरुवात केली . परिणाम काय झाला ? त्यांना संपूर्ण विश्व ओळखत आहे . 

    ते ग्रीक देशाचे सर्वश्रेष्ठ वक्ता बनले . एवढेच नव्हे तर अर्वाचीन काळातही या कलेच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम आदर्श बनले . एखाद्या उच्च उद्देशाचा निश्चय करताना वेळेचा संकोच करू नका . ' अमुक कार्य करण्याची माझी योग्यता नाही . अशा संशयाला मनात थोडेदेखील स्थान देऊ नका . व्यवहारात स्वतःची स्थिती मग कितीही दरिद्री असू द्या , तरीही चिंता करू नका . धन - वैभवाची सर्व आकर्षणे पाहून आकर्षित होऊ नका . अनंत - अनंत आकर्षणे पाहूनही जो सर्वोच्च आहे त्या आपल्या आत्मस्वरूपातच तल्लीन रहा . मोठमोठ्या धनवान व्यक्तीदेखील तुमच्या आत्मबळापुढे छोट्या वाटतील . 

    प्रचंड श्रद्धा व विश्वासाद्वारे अंतःकरणाची सुषुप्त शक्ती जागृत करून मानव नरातून नारायण बनू शकतो . जसजशी आत्मश्रद्धा वाढते , तसतशी कार्यशक्तीदेखील वाढत जाते . आपल्या श्रद्धेचे पात्र जर लहान असेल तर त्यात ईश्वरीय शक्तींचा प्रवाहदेखील तितक्याच कमी प्रमाणात असेल . ज्यांना स्वतःच्या जीवनाच्या महानतेवर अढळ श्रद्धा होती असे लोक इतिहासाच्या पानांवर अमर झाले आहेत . जे असे मानतात की त्यांना कोठतरी जायचेच आहे , अशा लोकांसाठी जग आपोआप मार्ग बनविते . तुमचे जीवन तुमच्या श्रद्धेनुसारच होईल . जीवनाला सफल बनविण्यात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की मनुष्याने स्वतःचे जीवन उत्साह , आनंद आणि उल्हासात जगले पाहिजे आणि स्वतःच्या शक्तींवर विश्वास ठेवून , सफलतेच्या पथावर अग्रेसर झाले पाहिजे . श्रद्धाच आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकविते . जेथून जीवन प्रवाह सुरू होतो त्या शक्ती स्रोताचे द्वार आपली श्रद्धाच उघडते . 

    व्यक्तीच्या आत्मश्रद्धेच्या बळावरच आपण तिच्या जीवनाच्या सफलतेचे मूल्यांकन करू शकतो . खरे पाहता आशेच्या क्षणात जे दिसते तेच मनुष्याचे खरे स्वरूप आहे . निराशेच्या वेळी त्याला जे दिसते ते अंधःकाराने घेरलेले त्याचे रूप सत्य नाही . आपण आपल्या मनाला आपली शक्ती व योग्यतेविषयी जसा विश्वास देतो , तशीच सफलता आपल्याला मिळते . जग व्यक्तीचे मूल्यांकन तिची आत्मश्रद्धा व दृढ जीवन - लक्ष्याद्वारेच करते . ज्या व्यक्तीमध्ये आत्मश्रद्धा नाही , तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही . 

    आत्मश्रद्धा मानसिक राज्याची साम्राज्ञी आहे . मनाच्या इतर शक्ती जणूकाही त्याच्या सेनेतील सैनिक आहेत . त्या शक्ती आपल्या सम्राटाच्या प्रेरणेने वाढतात . सैनिक त्यांच्या सम्राटाच्या मागे जातील , त्याच्यावर विश्वास ठेवून जातील , त्याच्यासाठी प्राण देतील ; परंतु ज्यावेळी सम्राट डगमगून जाईल , त्यावेळी त्याची सेनादेखील नष्ट होईल . अर्थात आत्मश्रद्धा डगमगताच मनाची शक्तीदेखील नष्ट होईल . संपूर्ण विज्ञानक्षेत्रात एडिसनचे नाव खूप प्रसिद्ध आहे . त्याने एकाच वेळी अनेक प्रयोग सुरू केले होते . 

    प्रत्येक प्रयोगात कोणती ना कोणती चूक होतच होती . हजारो रुपयांची साधने आणि लाखो रुपयांची यंत्र सामग्री स्थापित करूनही इच्छित परिणाम येत नसे . तो पुन्हा नवीन पद्धतीने वारंवार प्रयोग करीत असे ; परंतु मुख्य चूक होतच असे . पुढे काय करावे ? हे समजत नसे . एक रात्री त्याच्या प्रयोगशाळेला आग लागली आणि सर्वकाही जळून खाक झाले . सकाळी एडिसनने त्याच राखेच्या ढिगावर उभे राहून स्वतःच्या डायरीत लिहिले : " दैवी - प्रकोपालाही महत्त्व असते . या भयंकर आगीत माझ्या सिद्धीबरोबर माझ्या सर्व चुकाही जळून गेल्या .

    ईश्वराचा आभारी आहे की आता सर्व नवीन पद्धतीने सुरू होऊ शकेल . ' " त्यानंतर ताबडतोब त्याने एका छोट्याशा झोपडीत एकदम साध्या साधनांद्वारे स्वतःचे प्रयोग सुरू केले . सर्वकाही भस्म करणारी आग त्याच्या उत्साहाला भस्म करू शकली नाही . एडिसनने लहान - मोठ्या समस्यांची अवहेलना केली नसती तर त्याच्या नावापुढे २००० पेक्षाही अधिक शोध लिहिले गेले नसते . विश्वविख्यात नेपोलियन बोनापार्टने एक सामान्य सैनिकाच्या रूपात कामकाज सुरू केले होते . 

    एका युद्धाच्या दरम्यान त्याच्या तुकडीने जंगलात तळ ठोकला होता . नेपोलियनच्या नेत्याने त्याला शत्रूच्या छावणीजवळ जाऊन आवश्यक माहिती घेऊन आणण्याचा आदेश केला . हातात छोटासा रूपरेखांचा नकाशा देऊन समजावित म्हणाला : " मिळेल ना मार्ग ? " " मार्ग शोधून काढीन आणि नाही मिळाला तर स्वतः मार्ग बनवू शकेन . " असे बोलून नेपोलियन दृढतापूर्वक चालू लागला स्वतःचे कार्य सिद्ध करण्यासाठी . 

    त्याच्या संपूर्ण जीवनात दुसऱ्यांद्वारे बनविलेल्या मार्गाचा शोध घेण्यात त्याने वेळ वाया घालविला नाही , तर अनेकानेक अडचणींमधूनही त्याने स्वतःचा मार्ग स्वतःच बनविला . दृढ निश्चय व आत्मश्रद्धेने स्वतःच्या मार्गात येणाऱ्या अनेक संकटांना पायदळी तुडवून जीवनाला सफलतेच्या शिखरावर उभे केले . फ्रान्सचा महान सम्राट बनून त्याने स्वतःचे वाक्य सिद्ध करून दाखविले . इतिहास त्याचा साक्षी आहे . 

    पोलिओने पीडीत एक व्यक्ती कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हता . त्याच्या डॉक्टरांनी अनेक उपाय केले ; परंतु तो कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हता . एकदा दवाखान्यात आग लागली , ज्वाळा आकाशाला भिडू लागल्या , कुबड्या शोधण्याला वेळच नव्हता आणि एक क्षणदेखील व्यर्थ गेला असता तर तो जळाला असता . त्याने सरळ - सरळ धावायला सुरवात केली . 

    कुबड्या आपोआप कायमच्याच सुटल्या , कोठून आली ही शक्ती ? आत्म्याच्या अखूट भांडारातूनच ना ! आत्मश्रद्धेमुळे संपूर्ण जीवनात परिवर्तन येते . असफलतेचे मेध विखरून सफलतेचा सूर्य चमकू लागतो . 

Post a Comment

0 Comments