आधी - व्याधीपासून मुक्ती


आधी - व्याधीपासून मुक्ती 

आधी - व्याधीपासून मुक्ती

Photo by Milada Vigerova from Pexels


    श्रीरामांनी विचारले : " हे मुनीश्रेष्ठ ! शरीरात व्याधी व मनात आधी कशा निर्माण होतात ? 

    " वशिष्ठ मुनी म्हणाले : " प्रिय रामचंद्र ! मनाच्या इच्छा - वासना व चिंतेने आधी उत्पन्न होतात आणि वात , पित्त व कफ या दोषांच्या असंतुलनाने व्याधी उत्पन्न होतात . ' 

    आपल्या शरीरात हजारो सामान्य नाड्या आहेत . त्यांच्यात अन्न , रस इ . च्या अत्यंत अधिकता किवा कमतरतेमुळे सामान्य रोग उद्भवतात आणि शंभर प्रमुख नाड्या आहेत , ज्यांच्यात विलासिता आणि इतर मानसिक कारणांमुळे मलिनता भरल्यामुळे मोठे रोग होतात . आधी हा मनाचा रोग आहे आणि व्याधी तनाचा रोग आहे . हा जीव कधी आधी , अर्थात मनाची चिंता , भय , शोक इ . मुळे तर कधी व्याधीमुळे दुःखी होतो . दुःखाच्या परिवर्तनालाच तो बिचारा सुख मानतो , ज्यामुळे तो पुन्हा सुखाच्या नावावर दुःखच भोगत असतो . 

    तनाची व्याधी व मनाची आधी कमी - जास्त प्रमाणात सर्वांनाच असते ; परंतु जो परम पुरुषार्थी आधी - व्याधीच्या मुळ कारणास शोधून त्याला दूर फेकतो , त्याच्या आधी - व्याधी जास्त कालावधीपर्यंत टिकू शकत नाही . अमुक वस्तू , अमुक स्थिती , अमुक धन , रूप - लावण्य , पद - प्रतिष्ठा इ . च्या इच्छेमुळे मनात आधी येतात , मन चिंतित होते . साधारण चिंतित झााला तर सामान्य नाड्यांवर प्रभाव पडतो आणि विशेष चिंतित झाला तर विशेष नाड्यांवर प्रभाव पडतो . जीव जेव्हा अग्नीवर शिजविलेला भोजन - पदार्थ ग्रहण करतो , तेव्हा जठाराग्नी त्याला पुन्हा आत शिजवितो आणि त्याच्यापासून बनणारा रस रसवाहिन्या आणि रक्तवाहिन्या ग्रहण करतात , तसेच शरीररूपी यंत्र चालवितात . परंतु जेव्हा मनात चिंता , भय , शोक येतात , तेव्हा नाड्या क्षुब्ध होतात , ज्यामुळे नाड्यांची कार्यक्षमता नष्ट होते . याच कारणास्तव पशू अथवा दुर्बळ मनाचे लोक जेव्हा घाबरतात तेव्हा त्यांच्या नाड्या कार्यक्षमता गमवून बसतात आणि त्यांच्या मल - मूत्राचे विसर्जन होते . 

    अंतःकरणात नश्वर वस्तूंच्या आसक्तीला वासना म्हणतात . ही वासनाच आसक्ती व प्रियतेचे रूप धारण करून वानराप्रमाणे आठ प्रकारच्या सुखांची आशा , तृष्णा व ममतेत उड्या मारीत असते . जीव स्वतःचे वास्तविक स्वरूप न जाणल्यामुळे या आधींचा अनेक जन्मापासून शिकार होत आला आहे . 

    अनेक वेळा प्रदोष काळात केलेले भोजन , मैथुन इ . नी , अशुद्ध अन्न , अपवित्र संपकाने अथवा ऋतू बदल्याने व्याधी निर्माण होतात , जो आधीचा शिकार असतो त्याला व्याधी जास्त सतवितात . बरेचदा प्रथम व्याधी होते नंतर आधी होते आणि अनेक वेळा आधीमुळे व्याधी निर्माण होते . अनेकांच्या जीवनात दोन्ही एकाच वेळी ठाण मांडून बसलेले असतात . 

    ज्या व्याधी आधीविना उत्पन्न होतात त्यांना आयुर्वेदिक उपचार , होमिओपॅथी , नॅचरोपॅथी उपचार , मंत्र , आशीर्वाद , जप , ध्यान , प्राणायाम , योगासन इ . द्वारे नष्ट करता येते . आधीला ईश्वरार्पित कर्म , सत्संग व साधू - समागमाद्वारे कमी करता येते . 

    शरीरच्या रोग - निवारणासाठी तर अनेक चिकित्सालये , औषधालये , डॉक्टर , हकीम , वैद्य इ . ची व्यवस्था असते ; परंतु मनाचे रोग दूर करण्यासाठी असे उपाय मोठ्या मुश्किलीने कोठे कोठे प्राप्त होतात . आधी व व्याधी , जी अविद्या अर्थात आत्म्याच्या अज्ञानाने उत्पन्न होते , ती अविद्या निवृत्त करण्याचे स्थळ तर त्याहूनही दुर्लभ आहे , विरळे आहे . शरीराची व्याधी तर एकदा नष्ट झाली तरी पुन्हा होते , मनाची आधीही नष्ट होऊन पुन्हा होते ; परंतु दोघांचे कारण आत्म - अज्ञान जेव्हा नष्ट होते , तेव्हा हा जीव स्वतःच्या शिव स्वभावाचा अनुभव करून मुक्तीचा आनंद प्राप्त करतो मग त्याला आधी सतावित नाही आणि व्याधीही जास्त उद्भवत नाही . 

    कधी प्रारब्धवेगाने शरीरात व्याधी झाली तरी ती त्याच्या चित्तावर प्रभाव पाडत नाही , जसे , रामकृष्ण परमहंस , रमण महर्षीसारख्या जीवन्मुक्त महापुरुषांच्या चित्तावर पीडादायक रोगाचाही प्रभाव पडला नव्हता . शारीरिक व्याधी मिटविण्यासाठी जितकी दक्षता आवश्यक आहे त्यापेक्षा अर्धी दक्षता मनाच्या रोगाला निवृत्त करण्याची असेल तर तन मन दोघेही निरोगी राहतात , त्यापेक्षाही कमी परिश्रम जर आधी व्याधीमध्ये फसविण्याच्या अविद्येला मिटविण्यासाठी केले तर जीव कायमचाच मुक्त होऊ शकतो . अज्ञानामुळे आपला मन - इंद्रियांवरील संयम राहत नाही . परिणामी चित्तदेखील रात्रंदिवस आसक्ती - द्वेषाने प्रेरित होऊन ' हे मिळावे ... हे न मिळावे ... ' करून मोहग्रस्त होते . 

    अनेक इच्छा निर्माण झाल्यामुळे , अविद्यामुळे , चित्ताला न जिंकल्यामुळे , अशुद्ध आहाराचे सेवन केल्याने , संध्याकाळी व प्रदोषकाळात भोजन आणि मैथुन केल्यामुळे , स्मशान इ . अयोग्य ठिकाणी फिरल्यामुळे , दुष्ट कर्माचे चिंतन केल्यामुळे , दुर्जनांच्या संगतीमुळे , विष , सर्प , सिंह इ . च्या भीतीमुळे , नाड्यांमध्ये अन्नरस न पोहोचल्यामुळे अथवा अधिक पोहोचल्यामुळे उत्पन्न कफ पित्तादी दोषांमुळे , प्राण व्याकूळ झाल्यामुळे व अशा प्रकारच्या इतर दोषांमुळे व्याधी उत्पन्न होतात . 

    आता या आधी व व्याधी कशा प्रकारे नष्ट होऊ शकतात , ते पाहूया . आधी दोन प्रकारची असते : एक सामान्य व दुसरी जटिल . भूक तहान आणि स्त्री - पुत्रादींच्या इच्छेमुळे इ . मुळे झालेली आधी सामान्य मानली जाते आणि जन्म इ . विकार देणाऱ्या वासनामय आधीस जटिल आधी म्हटले जाते . अन्न - जल आणि स्त्री - पुत्रादी इच्छित वस्तू प्राप्त झाल्यामुळे सामान्य आधी नष्ट होते आणि आधी नष्ट झाल्यामुळे मानसिक रोगदेखील नष्ट होतात . ज्याप्रमाणे रज्जूत अज्ञानाने झालेला सांचा भ्रम दोरखंडाच्या खऱ्या ज्ञानाविना दूर होत नाही , त्याप्रमाणे आत्मज्ञानशिवाय जन्म - मरणला उत्पन्न करणारी जटिल वासनामय आधीही नष्ट होत नाही . ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदी किनाऱ्यावरचे सर्व वृक्ष उपटून टाकते , तसेच जर जन्म - मृत्यूची जटिल आधी नष्ट झाली तर ते ( आत्मज्ञान ) सर्व आधी - व्याधींना मुळापासून उपटून फेकून देते . 

    अनेक वेळा आधीद्वारे व्याधी उत्पन्न होते . कशी ? चित्त जर विषाद , चिंता , भीती इ . ने ग्रस्त असेल तर त्याचा परिणाम शरीरावरही पडतो . परिणामी शरीरात व्याधी उत्पन्न होतात . 

इन्द्रियाणां मनोनाथः मननाथस्तु मारुतः । 

    इंद्रियांचा स्वामी मन आहे . मनाचा स्वामी प्राण आहे . प्राण जर क्षुब्ध झाले तर नाड्यांची कार्यक्षमता क्षीण होते , ज्यामुळे व्याधी उत्पन्न होतात . अशा व्याधी नष्ट करण्यात मंत्रजाप , साधुसेवा , पुण्यकर्म , तीर्थस्नान , प्राणायाम , ध्यान , सत्कृत्य इ . साहाय्यक आहेत . त्यामुळे आधी नष्ट होतात आणि आधी नष्ट झाल्याने त्यापासून निर्माण झालेल्या व्याधीदेखील दूर होतात . शांत चित्तात सत्त्वगुण वाढल्यामुळे तन व मनाचे रोग नष्ट होतात . सुखाची लालसा व दुःखाच्या भीतीमुळे मन अपवित्र होते . सुखस्वरूप परमात्म्याचे ध्यान केले आणि दुःखहारी श्रीहरीची शरण खऱ्या हृदयाने घेतली तर आधी - व्याधींचा आघात जास्त होत नाहीत . 

    प्रेम ईश्वरावर करावे आणि इच्छा संसाराची करावी , अथवा प्रेम संसारावर करावे आणि इच्छा ईश्वराची करावी , असा मनुष्य गोंधळून जातो . परंतु जो बुद्धिमान आहे तो ईश्वर प्राप्तीच्या इच्छेनेच ईश्वरावर प्रेम करतो . त्याच्या सांसारिक परिस्थित्या प्रारब्धवेगाने चालतात . लोकदृष्ट्या सर्व प्रवृत्त्या करीत असूनही त्याच्या गौण व मुख्य - दोन्ही वृत्त्या ईश्वरातच राहतात . तो ईश्वरावरच प्रेम करतो आणि ईश्वराची इच्छा करतो . ईश्वर नित्य आहे म्हणून त्याच्या विनाशाचे भीती नसते . ईश्वर सदैव आपला आत्मरूप आहे म्हणून त्या विवेकी मनुष्याला वियोगाचा संशयही नसतो . म्हणून तुम्हीदेखील ईश्वराची इच्छा करा व ईश्वरावरच प्रेम करा , त्यामुळे भीती व संशय निश्चिंतता आणि शुद्ध प्रेमात परिणत होईल . 

    जसे हत्ती पाण्यात पडल्यावर क्षोभामुळे पाणी वर उसळते , जसे बाण लागलेले हरीण मार्ग न मिळाल्यामुळे सैर - भैर धावू लागते , तसेच शरीरात क्षोभ झाल्यावर प्राणादी वायू समान क्रिया सोडून उलट - सुलट गती करू लागतात . सर्व नाड्यांमध्ये कफ - पित्तादी दोष भरल्यामुळे विषमता निर्माण होते . प्राणांद्वारे नाडीतंत्र क्षुब्ध झाल्यामुळे अनेक नाड्या -रसाने पूर्णपणे भरून जातात तर अनेक नाड्या एकदम रिकाम्या राहतात . 

    प्राणांची गती बदलल्यामुळे एकतर अन्न - रस बिघडून जातो किंवा अन्न न पचल्यामुळे अजीर्ण होते , अथवा अन्नरस अत्यंत जीर्ण होतो , सुकून जातो , ज्यामुळे शरीरात विकार उत्पन्न होतो . जसे नदीचा प्रवाह लाकूड , वाळलेले गवत इ . ना समुद्राकडे घेऊन जातो , तसेच प्राणवायू खाल्लेल्या अन्नाचा रस बनवून शरीरात आपापल्या ठिकाणी पोहोचवितो . परंतु जे अन्न प्राणवायूच्या विषमतेमुळे शरीरांतर्गतच कुठेही अडकले जाते , ते स्वाभाविकपणे कफ वगैरे धातूंना बिघडवून व्याधी उत्पन्न करते . अशाप्रकारे आधीमुळे व्याधी उत्पन्न होतात आणि आधी नष्ट झाल्यावर व्याधीदेखील नष्ट होतात . 

    श्री वशिष्ठ मुनी म्हणतात : " हे श्रीरामचंद्र ! जसे हरडे सेवनामुळे जुलाब होतात , तसेच मंत्राच्या उच्चारणाने , आरोग्य - मंत्राचा श्रद्धापूर्वक जप केल्यामुळे आधी - व्याधी नष्ट होतात . जसे कसोटी केल्यावर सोन्याचा निर्मळपणा प्रगट होतो , तसेच शुभकर्म वा पुण्यकर्म केल्यामुळे सत्पुरुषांची सेवा केल्यामुळे चित्त निर्मळ होते . जसे पूर्ण चंद्रोदय झाल्यामुळे जगात प्रकाश वाढतो , तसेच चित्त शुद्ध झाल्यामुळे आरोग्य व आनंद वाढू लागतो . चित्त शुद्ध राहिल्यामुळे प्राणवायू स्वतःच्या क्रमानुसारच संचार करतो आणि भोजन व्यवस्थित पचवितो , ज्यामुळे व्याधी नष्ट होते . 

    आपल्याला हेच दृष्टीगोचर होते की , आपण बाह्य उपचारांमध्येच स्वतःचा वेळ - शक्तीचा -हास करतो , तरीही व्याधींमधून निवृत्त होऊन आनंद व शांती मिळवू शकत नाही . परंतु चित्तशुद्धीच्या मागनि व्याधी नष्ट झाल्यावर आनंद व शांती प्राप्त होते . देशातील लोकांनी जर श्री वशिष्ठ मुनींचे उपाय अमलात आणले तर किती श्रम - शक्ती वाचेल आणि मनुष्य आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त करू शकेल !

Post a Comment

0 Comments