दसरा सण


दसरा सण

 

दसरा सण

Photo from Google Images


'दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा' असं म्हणतात. असा हा दसरा म्हणजेच विजयादशमी. अश्विन शुध्द दशमी म्हणजेच हा दिवस. हिंदू शास्त्राप्रमाणे प्रमुख साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो.

 

रामायणातील कथेनुसार रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळविला म्हणून हा दिवस आनंदोत्सवाचा. या दिवशी आजही अनेक ठिकाणी गावाच्या सीमेवर रावणवधाचा प्रतीकात्मक कार्यक्रम करतात.

 

पांडवांना द्यूतात हार खाल्ल्याने १२ वर्षे वनवास एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. हा अज्ञातवास संपवून पांडव प्रकट झाले त्यांनी शमी वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे धारण केली, तोही दिवस आजचाच.

 

या दिवशी सोने लुटायचे असते. सीमोल्लंघन करायचे असते. याचे कारण असे की, पावसाळा संपलेला असे; त्यामुळे युध्दाला बाहेर पडण्यास अनुकूल कालावधी असल्याने पूर्वी राजे लोक या दिवशी सीमोल्लंघन करीत असत. फार पूर्वी वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स याला गुरुदक्षिणा देण्यासाठी १४ कोटी सुवर्ण मोहरा हव्या होत्या. त्या मिळाव्यात म्हणून तो दानशूर अशा रघुराजाकडे आला. पण रघूने मोठा यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान नुकतेच केले होते. आता तो मोहरा कसा देणार? पण कौत्साला रिकामे माघारी पाठविणेही योग्य नाही.

 

शेवटी रघुराजाने कुबेरावर स्वारी करायची ठरविले, पण रघुच्या पराक्रमाची ओळख कुबेराला होती. त्याने त्या रात्रीच रघुच्या नगरीवर सुवर्ण मोहरांचाच पाऊस पाडला. त्यावेळी या मोहरा शमीच्या, आपट्याच्या झाडावर पडल्या. कौत्साने त्यातल्या १४ कोटीच मोहरा फक्त घेतल्या.

 

त्याला जास्त नको होत्या, तर रघुराजा म्हणाला, “मला तरी या काय करायच्या?' म्हणून त्याने त्या सर्व मोहरा लुटून टाकल्या. तेव्हापासून या दिवशी म्हणजेच विजयादशमीस सोने म्हणून शमी किंवा आपट्याची पाने लुटतात, परस्परांना देतात.

 

अश्विन शुध्द प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या दुर्गा महोत्सवाची समाप्ती याच दिवशी असते. देवीचा हा नवरात्रोत्सव अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात साजरा करतात. याच वेळी शारदोत्सव साजरा करून देवी सरस्वतीचेही पूजन करतात. दसऱ्याच्या आदले दिवशी शस्त्रपूजनाची परंपराही रूढ आहे. अशा या विजयादशमी उत्सवातून आपण जीवनात विजयी होण्यासाठी प्रेरणा घेऊ या!

 

Post a Comment

0 Comments