माझा आवडता सण : दीपावली

 

माझा आवडता सण : दीपावली

माझा आवडता सण : दीपावली

Photo from Google Images

तुझा आवडता सण कोणता? असे जर मला कोणी विचारले तर..... मीच काय आपल्यापैकी अनेकजण उत्तर देतील - दिवाळी. हो हो दिवाळीच, कारण सर्व सणांचा राजा शोभावा असा हा मोठा दिमाखात येणारा सण आहे.. हा सण एखाद्या रेल्वेसारखा येतो. कोजागिरी हा सिग्नल असतो दिवाळी जवळ आल्याचा अन् तुळशीचं लग्न हा सिग्नल असतो दिवाळी संपल्याचा. मध्ये मग नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, एकेक दिवस म्हणजे एकेक डबाच जणू आनंदानं भरलेला.

 

वसुबारसेच्या दिवशी वासरासह गायीचं गोमातेचं पूजन करण्याची प्रथा आहे, तर अश्विन वद्य १३ म्हणजे धनत्रयोदशी. हे धनाचं धन्वंतरीचं पूजन करण्याचा दिवस. धन्वंतरी म्हणजे वैद्यकशास्त्राची अधिष्ठात्री देवता. देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने निघाली त्यातीलच एक धन्वंतरी...

 

श्रीकृष्णाच्या पराक्रमाची आठवण देणारा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. प्रागज्योतिषपूर (सध्याचा आसाम) येथे असलेला नरकासुर हा अतिशय दुष्ट होता. त्याच्या छळातून जनतेला सोडविण्यासाठी स्वत: श्रीकृष्ण तिकडे गेला. त्याने नरकासुराचा वध केला. लोकांची संकटातून मुक्तता केली. त्याप्रीत्यर्थ लोकांनी दीपोत्सव - आनंदोत्सव केला. तीच प्रथा आजही चालू आहे.

 

अश्विन अमावास्या हा लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी सायंकाळी घरातील दागदागिने - मौल्यवान वस्तू - लक्ष्मीची प्रतिमा या साऱ्यांचे मनोभावे पूजन करायचे आणि सर्वत्र समृध्दी असावी अशी प्रार्थना देवाला करायची.

कार्तिक शुध्द प्रतिपदा हा दिवाळीचा पाडवा म्हणून मानतात.

 

बलिप्रतिपदा असं याचं दुसरं नाव. बळी राजाला पाताळात पाठविणारा बटू वामन म्हणजेच भगवान श्री विष्णू यांनी हा दिवस बळीपूजेचा - बळींच्या प्रजेस बळीस भेटता यावे म्हणून ठरवून दिलेला आहे असे मानतात. व्यापारी लोकांचे नववर्ष या दिवशी सुरू होते. साडेतीन मुहूर्तात यालाही स्थान आहे.

 

यानंतरचा दिवस म्हणजे 'दादा - ताईचा' यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज. पुरातनकाळी यमीच्या घरी जाऊन यमाने तिला वस्त्रालंकार देऊन सत्कार केला, अशी कथा आहे. म्हणून बहिणीच्या घरी जाऊन भावाने बहिणीला स्नेहाची भेट ओवाळणी म्हणून द्यावी. बहिणीने भाऊरायाला गोड जेवण करून घालावे, अशी प्रथा पडली आजही ती चालू आहे.

 

या सणात दिव्याचे महत्त्व खूप आहे. घरांवर पणत्या लावणे, दिव्यांची रोषणाई करणे, आकाशकंदील लावायचे यामुळे याला दीपोत्सव किंवा दीपावली असेही नाव आहे. लाडू, करज्या, चिवडा, चकल्या असे फराळाचे पदार्थ खाणे, गोड पक्वान्नाचे जेवण आणि शाळेला सुट्टी यामुळे मुलांचा तर हा सर्वात आवडता सण आहे. मग आपणही दीपांच्या प्रकाशाने अंधाराचा नाश करणार ना? ज्ञान प्रकाशाने अज्ञान घालवणार ना?

Post a Comment

0 Comments