हेच खरे गुरुपूजन...

 

हेच खरे गुरुपूजन...

 

हेच खरे गुरुपूजन...

Photo from Google Images

गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुपूजनाचा दिवस. भारतीय संस्कृतीत या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस आषाढ पौर्णिमेस साजरा करतात. वेदांचे लेखन करणारे, भगवान वेदव्यास हे सर्वमान्य गुरू असल्याने या दिवसास व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

 

गुरू परंपरेचा इतिहास आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासूनचा आहे. देवांचे गुरू बृहस्पती मानले जातात, तर दानवांचे गुरू शुक्राचार्य यांची सेवा करून कचाने संजीवनी विद्येची प्राप्ती करून घेतली.

 

विश्वामित्र - राम, सांदिपनी - कृष्ण, द्रोण - एकलव्य, निवृत्तीनाथ - ज्ञानदेव, दादोजी कोंडदेव - शिवाजी महाराज अशा अनेक गुरू - शिष्य जोड्या प्रसिध्द आहेत.

 

'गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः।। गुरु: साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः।।'

 

या श्लोकात गुरूचे महत्त्व चांगल्या पध्दतीने वर्णन केले आहे. गुरू म्हणजे निर्माता - साक्षात ब्रम्हदेव, गुरू म्हणजे पालनकर्ता विष्णू, गुरू म्हणजे भगवान श्री शंकर अर्थात गुरू म्हणजे या तिन्ही देवांचे - शक्तींचे एकत्रित रूप. साक्षात परब्रह्म होय. म्हणूनच गुरूच्या पूजनामुळे, सेवेमुळे ईश्वराची कृपा लाभते.

 

आपल्या जीवनाचे कल्याण होते. जसं गुरूला महत्त्व आहे तसेच गुरुदक्षिणेलाही महत्त्व आहे. कृष्णाने सांदिपनी ऋषींचा हरवलेला मुलगा गुरुदक्षिणा म्हणून शोधून आणला. द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडे उजव्या हाताचा अंगठा मागितला होता आणि एकलव्याने तो लगेच काढून दिला होता, हे आपण गोष्टींमधून ऐकले आहेच. गुरुचरित्र नावाच्या एका प्रसिध्द भारतीय ग्रंथात तर म्हटले आहे की - 'जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरू केला जाण '

 

याचा अर्थ आपण अनेकांकडून अनेक गोष्टी शिकत असतो, त्यामुळे त्या प्रत्येकाला गुरूच मानले पाहिजे. आपली आई ही आपली प्रथम गुरू असते. वडील, भाऊ - बहिणी, शाळेतील शिक्षक हे हळूहळू आपले गुरू होतात. आपण आपल्या समाजात फिरत असताना नकळत कसे राहावे, कसे वागावे, कसे बोलावे अशा गोष्टी शिकतो. काय चांगलं, काय वाईट हे समाजाचा विचार करून ठरवतो. म्हणजे एका अर्थाने समाज हा आपला गुरूच आहे आणि म्हणूनच समाजाची सेवा करण्याची, समाजासाठी कष्ट सोसण्याची प्रतिज्ञा आपण प्रत्येकाने आजच्या दिवशी केली पाहिजे, तरच आपल्या समाजाचा म्हणजेच राष्ट्राचा विकास होईल. तरच खऱ्या अर्थाने गुरुपूजन घडेल.

 

Post a Comment

0 Comments