स्व. इंदिरा गांधी

 

स्व. इंदिरा गांधी
स्व. इंदिरा गांधी

Photo from Google Images

राजकीय क्षेत्रात अलीकडच्या काळात ज्या महिलांनी श्रेष्ठ कामगिरी बजावली, त्यांच्या यादीतले महत्त्वाचे नाव म्हणजे स्व. इंदिरा गांधी - भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान.


स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची प्रिय कन्या म्हणजेच प्रियदर्शिनी इंदिरा.आपले आजोबा मोतीलाल नेहरू यांच्या मांडीवर बसून न्यायनिवाडे ऐकणाऱ्या इंदिरेने आपल्या चौकस बुध्दीने अनेक गोष्टींचे निरीक्षण केले होते. शिवाय वडिलांचे मार्गदर्शन होतेच.

 

आपल्या अंगच्या गुणांमुळे हळूहळू राजकारणात प्रवेश करीत पुढे आलेल्या इंदिराजी १९६६ साली भारतासारख्या खंडप्राय देशाच्या पंतप्रधान झाल्या. सारे जग चकित झाले होते. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला भारत आणि देशाचा कारभार एका महिलेकडे? अनेक दिग्गज नेते काँग्रेसमध्ये असतानाही हे घडले! याचे कारण एकच होते. इंदिराजींचे अष्टावधानी, धाडसी, करारी व्यक्तिमत्त्व आणि अचूक निर्णयशक्ती.

 

१९७१ च्या भारत - पाक युध्दाच्या वेळी त्यांच्या राजकारण कौशल्याची खरी परीक्षा झाली. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन त्यांनी भारताची कीर्ती वाढविली. जगात भारताच्या भूमिकेचे कौतुक तर झालेच. पण इंदिराजींच्या निर्णयशक्तीचे दर्शन जगास घडले.

 

आणीबाणीच्या कालखंडानतर जनतेने दिलेला कौल स्वीकारून त्या सत्तेवरून दूर झाल्या. पण पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करून त्या देशाच्या नेत्या बनल्या. राष्ट्राच्या अखंडतेसाठी त्यांनी अतिरेक्यांविरुध्द कठोर कारवाई केली आणि याचाच परिणाम म्हणून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या झाली.

 

सारा भारत देश शोकाकुल झाला; एवढेच नव्हे, तर एका मुत्सद्दी नेतृत्वाला गमावून बसल्याचे दु: साऱ्या जगाने व्यक्त केले. भारतीय नारी शक्तीचे राजकारणात धुरंधर दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन.

Post a Comment

0 Comments