लाला लजपतराय


लाला लजपतराय
 
लाला लजपतराय

Photo by David Jakab from Pexels

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले. ब्रिटिशांच्या अत्याचारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. असेच एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे लाला लजपतराय. यांना 'पंजाबचा सिंह' म्हणून ओळखले जात असे. यांचा जन्म पंजाबातील जगराण या गावी झाला.

 

कायद्याची परीक्षा देऊन ते वकील झाले. त्यांचे वय त्यावेळी जेमतेम वीस वर्षांचे होते. पुढे त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. ते स्वामी दयानंदांचे निष्ठावंत अनुयायी होते. त्यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजला पाच लाख रुपये मिळवून दिले.

 

हळूहळू त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्यात रस घेतला. त्यांचे वक्तृत्व असामान्य होते, तसेच ते राष्ट्रीय मताचे पुरस्कर्तेही होते. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची कीर्ती भारतभर पसरली. राष्ट्रीय सभेने त्यांना प्रचारासाठी विलायतेला पाठविले. तेथून परतल्यावर त्यांनी येथील कार्यात अधिक जोमाने लक्ष घातले.

 

इंग्रज अधिकाऱ्यांना हे कसे चालेल? त्यांनी शेतकऱ्यांना चिथावणी देण्याच्या आरोपावरून त्यांना हद्दपार करून मंडालेस पाठविले. तेथून सुटका झाल्यावर त्यांनी काही काळ अमेरिकेत वास्तव्य केले. 'यंग इंडिया' हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी आपले प्रचार कार्य सुरूच ठेवले. ते अमेरिकेहून परतले तेव्हा असहकार युग सुरू होते. कलकत्ता येथील राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते.

 

लाला लजपतराय यांना असहकार चळवळ पसंत नव्हती. पण सर्वांबरोबर रहायचे म्हणून ते त्यात सामील झाले. 'पीपल' हे इंग्रजी पत्र, पीपल असोसिएशन, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थांसाठी त्यांनी खूप कार्य केले. ते कट्टर हिंदुत्ववादी होते. श्रीकृष्ण, . शिवराय, गॅरिबल्डी, मॅझिनी अशा थोरांची स्फूर्तिदायक चरित्रे त्यांनी लिहिली.

 

सायमन कमिशन निषेधार्थ निघालेल्या लाहोर येथील मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. त्याचवेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात जखमी होऊन पुढे १७ नोव्हेंबर १९२८ ला त्यांचे निधन झाले. स्वातंत्र्य लढ्यातील या थोर वीरास माझे विनम्र अभिवादन!

 

Post a Comment

0 Comments