महर्षी दयानंद

 

महर्षी दयानंद


महर्षी दयानंद

Photo from Google Images

आर्य समाज म्हटले की डोळ्यांसमोर नाव येते ते स्वामी दयानंद सरस्वती यांचे. पूर्वीच्या सौराष्ट्रात तन्कारा या गावी दयानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव मूळशंकर असे होते. करसनजी तिवारी हे त्यांच्या पित्याचे, तर अमृताबाई हे आईचे नाव होते. लहानपणापासून मूळशंकर अतिशय हुशार होता.

 

स्मरणशक्ती दांडगी होती. बुध्दी चौकस होती. एकदा असाच एक प्रसंग घडला. शिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरात भक्तगण जमले होते. वडिलांबरोबर मूळशंकरही तेथे जाऊन बसला होता.

 

मध्यरात्रीपर्यंत हळूहळू सारे भक्त झोपी गेले, पण निश्चयी उपासक मूळशंकर निग्रहाने रात्रभर जागण्यासाठी थांबला होता. त्याची नजर शिवलिंगाकडे होती. गाभाऱ्यात नंदादीपाचा प्रकाश पसरलेला होता. एवढ्यात एक उंदीर आला. शिवलिंगासमोरील नैवेद्य त्याने थोडा खाल्ला, नंतर तो शिवलिंगावर निर्धास्तपणे फिरत राहिला.

 

हे पाहून मूळशंकरला धक्का बसला. त्याने वडिलांना जागे करून अनेक प्रश्न विचारले, पण त्यांचे उत्तर त्याला समाधानकारक मिळाले नाही. सर्वशक्तिमान असणारा शिव एका उंदराला दूर घालवू शकत नाही, असे कसे? यामुळे मूळशंकरचा मूर्तिपूजेवरील विश्वास उडाला.

 

 

पुढे त्याच्या बहिणीचा, काकांचा मृत्यू त्याने पाहिला. त्यामुळे मृत्यू म्हणजे काय? हे कोडे त्याला सतावू लागले. अखेर मूळशंकरने या सर्व प्रश्नांचा शोध घ्यायचे ठरवून घराचा निरोप घेतला एकटाच प्रवास करू लागला. पुढे त्याची त्यावेळचे प्रसिध्द पंडित संन्यासी स्वामी पूर्णानंद यांची भेट झाली. त्यांनी त्याला धर्ममार्गावर चालण्याचे मार्गदर्शन केले. आणि येथूनच मूळशंकरनेदयानंद सरस्वती' हे नाव धारण केले.

 

पुढे स्वामी विरजानंदांचे शिष्यत्व स्वीकारून दयानंदांनी विविध धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला. परंपरागत घातक रुढींवर टीका करीत त्यांनी ईश्वर सर्वव्यापी आहे, निर्गुण, निराकार आहे असे प्रतिपादन केले. वैदिक ज्ञानाचा प्रचार केला, 'सत्यार्थप्रकाश' हा ग्रंथ लिहिला, आर्य समाजाची स्थापना करून आपल्या विचारांचे कार्य पुढे चालू राहील अशी व्यवस्था केली. एक महान ऋषी म्हणून त्यांना मान्यता लाभली.

 

समाजसेवेची अनेक कामे करण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या अनुयायांना दिली. ३० ऑक्टोबर १८८३ रोजी दिवाळीच्या दिवशी या महात्म्याने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जीवनातूनमानवसेवा हीच ईश्वरसेवा' हा बोध आपण घ्यायला हवा.

Post a Comment

0 Comments