विठ्ठलभक्त नामदेव

 

विठ्ठलभक्त नामदेव

 

विठ्ठलभक्त नामदेव

Photo from Google Images

आज मी ज्याच्याबद्दल बोलणार आहे - त्याचे नाव आहे संतशिरोमणी नामदेव. महान विठ्ठलभक्त असलेल्या या नामदेवाचा जन्म १२ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. आषाढ वद्य त्रयोदशी ही नामदेवांची पुण्यतिथी.

 

बालमित्रांनो, दामाशेटी आणि गोणाई यांच्या पोटी जन्मास आलेला हा मुलगा लहानपणापासूनच विठ्ठलभक्त होता. घरात भक्ती - भजनाची परंपरा होतीच. एक अशीच गोष्ट नामदेवाची सांगितली जाते. एकदा दामाशेटींना परगावी जायचे होते. त्यांनी नामाला सांगितले की, “देवळात जाऊन देवाची पूजा कर आणि नैवेद्यही ने बरोबर.”

 

दुसऱ्या दिवशी नामाने देवळात जाऊन पूजा केली. देवासमोर नैवेद्य ठेवला; पण पांडुरंग काही नैवेद्य खायला येईना. नामाने खूप विनविले; पण छे! शेवटी नामाने देवाला म्हटले, “पांडुरंगा, तू जर नैवेद्य खाणार नसशील तर मी येथेच तुझ्या पायावर डोके आपटून जीव देईन....' आणि खरंच!

 

नामाने डोके आपटायला सुरुवात केली. अखेर पांडुरंगाला दया आली. त्याने नामाजवळ येऊन नामाला थांबविले. नैवेद्य खाल्ला. आनंदाने नामदेव घरी गेला; पण प्रसाद आणल्याचे पाहून सर्वांनी विचारले, “नामदेवा, प्रसाद?' नामदेव म्हणाला, “पांडुरंगाने काहीच शिल्लक ठेवले नाही.'' प्रथम कोणाचा विश्वास बसला नाही; पण पुन्हा दुसऱ्या दिवशी नामदेवाच्या हट्टापायी पांडुरंगास जेवावे लागले आणि हे दृश्य दामाशेटींनी पाहिले.

 

त्यांचा विश्वास बसला. - हाच नामदेव पुढे भक्तिमार्गाचा प्रसारक झाला. विसोबा खेचरांना त्यांनी आपले गुरू मानले. नामदेव हा पांडुरंगाचा अत्यंत लाडका भक्त होता. नामदेव कीर्तन करू लागला, की पांडुरंग तल्लीन होऊन नाचत असे.

 

संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेव संपूर्ण भारतभर फिरले. विशेषत: उत्तर भारतात त्यांनी भक्तिमार्गाचा खूपच प्रसार केला. पंजाबात त्यांना अनेक शिष्य मिळाले. एकतेचा-समतेचाभक्तीचा संदेश देत सर्वत्र फिरून नामदेव परत महाराष्ट्रात पंढरपूरला आले आणि तेथेच पांडुरंगाच्या दारात त्यांनी समाधी घेतली. आपणही नामदेवाप्रमाणे कार्य करून आपल्या राष्ट्राची अखंडता टिकवू या.

Post a Comment

0 Comments