रागरागिणी लक्ष्मीबाई


रागरागिणी लक्ष्मीबाई

रागरागिणी लक्ष्मीबाई

Photo from Google Images

आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अशातीलच एक म्हणजे झाशीची राणी. 'मेरी झाँसी नहीं दूंगी' असे म्हणत ब्रिटिशांशी लढणारी, लढता लढता मरणारी ही थोर पराक्रमी स्त्री म्हणजे भारतमातेची पराक्रमी आदर्श कन्या होती.

 

१८ जून हा झाशीच्या राणीचा स्मृतिदिन. हिचे नाव राणी लक्ष्मीबाई. लहानपणी हिला कौतुकाने 'मनू' म्हणत. महाराष्ट्रातील मोरोपंत तांबे यांची ही कन्या. लहानपणापासून ती हुशार, चौकस, धाडसी होती. मोरोपंत बिठूर येथे पेशव्यांच्या सेवेत होते. त्यामुळे लढाई, शस्त्रास्त्रे, दरबार अशा शब्दांशी मनूची खूप जवळीक होती.

 

असाच एक प्रसंग घडला. रावसाहेब नानासाहेब पेशवे हत्तीवरून फेरी मारायला निघाले होते. मनूनेही त्यांच्याबरोबर जावे, असे बाजीरावांस वाटले, पण नानांनी माहुताला संकेत करून हत्ती पुढे नेला. नानाही लहान, मनूही लहान; पण मनूला या गोष्टीचा राग आला. ती हिरमुसली. मोरोपंत म्हणाले, “मनू, हत्तीवर फिरायला आपण राजे का आहोत? जे आपल्या भाग्यात नसते त्याची इच्छा का धरावी?'

 

त्यावर मनू ताडकन म्हणाली, 'माझ्या नशिबात एकच काय, अनेक हत्ती आहेत.' मोरोपंत म्हणाले, 'बरं असेच होवो.' पण मनातून त्यांना खूप वाईट वाटले. मनू म्हणाली, 'मी आता बंदूक चालवायलाही शिकणार आहे.' आणि घडलेही तसेच. मनू सर्व शस्त्रास्त्रे, युध्दकला, घोड्यावर बसणे असे शिकली. मोठेपणी तिचे लग्न झाशी संस्थानचे महाराज गंगाधरराव यांच्याशी झाले. मनू आता राणी लक्ष्मीबाई झाली. प्रत्यक्षात अनेक हत्ती - घोड्यांची मालकीण झाली. पण दुर्दैवाने गंगाधररावांचा मृत्यू लवकर झाला.

 

पुढे ब्रिटिशांच्या जाचातून देश सोडविण्यासाठी काहींनी लढा द्यायचे ठरविले. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे अग्रणी होते. त्यावेळी झाशीला राजा नव्हता, पण राणी लक्ष्मीबाईने स्वत: युध्दाचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांशी युध्द केले. इंग्रज अधिकारी ह्य रोज याच्या सैन्याशी राणीने चांगलीच लढत दिली. रणांगणात ती विजेप्रमाणे लखलखत होती. अखेर लढता लढताच तिला मरण आले; पण जिवंत असेपर्यंत ती इंग्रजांना शरण गेली नाही. 'मेरी झाँसी नहीं दूंगी' म्हणत मरणारी राणी इतिहासात अमर झाली. आपणही तिच्यासारखी जिद्द, पराक्रम दाखवून मोठे होऊ या.

Post a Comment

0 Comments