श्री संत ज्ञानेश्वर

 

श्री संत ज्ञानेश्वर

 

श्री संत ज्ञानेश्वर

Photo from Google Images

प्रत्येक राष्ट्रला एक राष्ट्रगीत असते. या गीतामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते, पण संपूर्ण विश्वात एकात्मता साधायची असेल तर... तर विश्वासाठी विश्वगीत असायला हवे. होय ना? आणि हो, असे विश्वगीत आहे. आपल्या भारतमातेच्या एका सुपुत्राने हे गीत तयार केले आहे. या सुपुत्राचे नाव म्हणजे संत ज्ञानेश्वर. सारे जण त्यांना 'माऊली' म्हणून ओळखतात.

 

विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या उभयतांच्या पोटी चार श्रेष्ठ जीव जन्माला आले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई. जणू साक्षात चार वेदच सजीव होऊन आले. यातीलच श्री ज्ञानेश्वर पुढे सर्वांची 'माऊली' बनले.

 

संन्याशाची मुले म्हणून लोकांनी या मुलांचा खूप छळ केला. गृहस्थाश्रमातून संन्यास पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणे रुढीविरुध्द होते. म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणीबाई यांनी देहान्त प्रायश्चित्त घेतले. चारी मुले पोरकी झाली, पण जगाच्या दृष्टीने. कारण मुलांच्या दृष्टीने ईश्वर त्यांचा पाठीराखा होताच.

 

पुढे शुध्दीपत्र मिळविण्यासाठी ही चारी भावंडे पैठणला आली. तेथील विद्वतसभेत ज्ञानदेवांनी आपले मनोगत व्यक्त केले तेव्हा अनेक पंडितांनी त्याची टिंगल केली. येथेच ज्ञानदेवांनी ईश्वर सर्वांच्या ठायी आहे असे सांगितले आणि रेड्याच्या मुखी वेद बोलविले आणि सारी सभा चकित झाली.

 

पैठणकरांनी या चारी भावंडांना डोक्यावर घेतले. सारे त्यांचे भक्त बनले. पुढे ही मुले नेवासे येथे गेली. तेथे ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर प्रवचने केली. सच्चिदानंदांनी ती लिहून काढली. हाच तो सर्वश्रेष्ठ ग्रंथ 'श्री ज्ञानेश्वरी'. पुढे ज्ञानराजांनी अमृतानुभव' हा ग्रंथही लिहिला.अनेक अभंग लिहिले.

 

सर्वत्र भक्तिमार्गाचा प्रचार करत ते पायी फिरले. पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या संतांचा मेळा जमविला आणि शेवटी आपल्या कार्याची पूर्तता झाली असे समजून श्री ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतली. आजही कार्तिक वद्य त्रयोदशीस आळंदीस त्या दिवसाचे स्मरण म्हणून मोठी यात्रा भरते. विश्वगीताचा गीतकार महान ईश्वरभक्त अशा या माऊलीस माझे शतश: प्रणाम.

 

Post a Comment

0 Comments